Baramati News : डोर्लेवाडी, ता. ६: बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू व आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉलीबॉल खेळाडू तुषार अरुण मोरे (वय-३४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. बुधवारी (ता. ०६) दुपारी हि घटना घडली असून या घटनेने डोर्लेवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लहानपणापासूनच खेळाची आवड
तुषार मोरे यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. येथील प्रसिद्ध असणाऱ्या सेव्हन स्टार कबड्डी संघात त्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर अनेक ठिकाणी सहभागी घेऊन वजनी व खुल्या गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. तसेच न्यू गोल्डन हॉलीबॉल या संघात देखील त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.
दुबई येथील अबुधाबी येथे झालेल्या देश पातळीवरील हौशी हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघात तुषार मोरे व सागर काळकुटे या डोर्लेवाडी येथील दोन खेळाडूंची निवड झाली होती. त्या ठिकाणी भारतीय संघाने प्रथम पारितोषिक मिळवले होते. महाराष्ट्रातील संगमनेर, सोलापूर, जेजुरी, वैराग, येडशी, काटी, ओतूर, पणदरे, मुरूम, मुर्टी, अंथूर्णे, लासूर्णे ,शारदानगर, माळेगाव या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सलग चौदा वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले होते. यामध्ये तुषार मोरे यांनी सेंटर व साईड या दोन्ही ठिकाणी उत्तम खेळ करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.
दरम्यान, बुधवारी सकाळी छातीत दुखू लागल्याने बारामती येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा डोर्लेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील अनेक खेळाडूंनी उपस्थिती दाखवून हळहळ व्यक्त केली.