दौंड, (पुणे) : बारामती-फलटण रस्त्यावर बँकेच्या रिकव्हरी एजंटचा धारधार शस्त्राने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वासुंदे (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन ऑईल पंपासमोर घडली आहे. शुक्रवारी (ता. ०१) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण मळेकर (रा. 551 गुरुवार पेठ, आधार कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर 301, युको बँकेसमोर कस्तुरी चौक, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा ऋषिकेश प्रविण मळेकर (वय 30) याने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मळेकर हे शुक्रवारी सकाळी घरातून सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून बँक आँफ महाराष्ट्र, शाखा बारामती या बँकेचे रिकव्हरीचे नोटीस वाटप करण्यासाठी गेले होते. त्यानंतर ऋषिकेशला प्रवीण मळेकर यांना कोणीतरी चाकू मारला आहे व ते जखमी अवस्थेत रोडवर पडलेले आहेत. तसेच त्यांना विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर या दवाखान्यात रुग्णवाहिकेतून पाठवून देत आहे. तुम्ही तेथे जाऊन थांबा असे सांगितले.
रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास प्रविण मळेकर यांना रुग्णवाहिकेतून विश्वराज हॉस्पिटलमध्ये आणले. यावेळी प्रविण मळेकर यांना पाहिले असता त्यांच्या पोटात कोणीतरी हत्याराने भोसकल्याने आतड्या बाहेर आलेल्या दिसल्या व पाठीवर, कमरेवजवळ वार झालेले दिसले.
डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती ऋषिकेश मळेकर यांना दिली. अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन धारदार हत्याराने भोसकून त्यांचा खुन केला. दौंड पोलीस ठाण्यात ऋषिकेश मळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात इसमाविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून एक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक व 15 कर्मचारी अशी टीम खुनाच्या तपासात काम करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.