लोणी काळभोर, (पुणे) : पैसे घेतलेल्या मित्राची माहिती न दिल्याने एका नायजेरीयन व्यक्तीला ८ ते १० नायजेरीयन नागरिकांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हांडेवाडी (ता. हवेली) येथे घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी तब्बल एक वर्षापासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर लोणी काळभोर पोलिसांनी पिसोळी (ता. हवेली) येथून गुरुवारी (ता.१४) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
संडे विलियम्स उर्फ ऍडमिन संडे औनवे (वय-३९, सध्या, रा. पिसोळी, ता. हवेली, मूळ रा. नायजेरीयन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी यापूर्वी या गुन्ह्यातील थॉमसन रोथीनी सोथोमेवा (वय 25) आणि फेडरिक उर्फ फेड इव्होव्ह (वय-३५, दोघेही रा. हांडेवाडी ता. हवेली) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी मायकेल ओकेलु चुकवुमेका वय ३८ रा. हांडेवाडी ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तर या गुन्ह्यातील ४ ते ५ साथीदार फरार आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायकेल चुकवुमेका हा कपड्याचा व्यापारी असून तो हांडेवाडी परिसरात राहतो. मायकेल चुकवुमेकाचा मित्र चार्ल ओझोए याने आरोपींकडून हातउसणे स्वरुपात काही रक्कम घेतली होती. दरम्यान, आरोपी चुकवुमेका याच्या१३ ऑक्टोबर २०२२ ला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घरी गेले आणि चार्ल कोठे आहे अशी अशी विचारणा केली. तेव्हा मायकेल याने माहित नसल्याचे सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, माहिती न दिल्याने आरोपींनी मायकेलला शिवीगाळ करून लोखंडी रॉड, हॉकी स्टीक, धारधार चाकु आणि इतर हत्याराने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत मायकेल गंभीर जखमी झाला होता. त्यांनतर मायकलने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ८ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी थॉमसन आणि फेडरिक यांना अटक केली आहे.
असं केलं आरोपीला अटक
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे यांना आरोपी संडे विलियम्स हा पिसोळी परिसरात राहत असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी संडे विलियम्सला पिसोळीतून मोठ्या शिताफीने अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्यातील ४ ते ५ साथीदार अद्यापही फरार आहेत. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस हवालदार केतन धेंडे, सोमनाथ गळकोट व कोंढवा पोलिसांच्या मदतीने केली आहे.