पुणे : शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकावर जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरूम समोर फायरिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता.१६) संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे. या घटनेने शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
धीरज दिनेशचंद्र आरगडे असं गोळीबार करण्याचा प्रयत्न केलेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन वेळा फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदुकीतून गोळी फायर न झाल्याने आरोपींचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी तेथून पुढे पळ काढला आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धीरज हे शहरातील जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरूमजवळ उभे होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून तिथे आले. याशिवाय त्यांनी हेल्मेट देखील घातलं होतं. शोरुमजवळ उभ्या असलेल्या धीरज यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्टल काढून दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फायर न झाल्याने दोघांनी घटनास्थळावरुन पुढे पळ काढला.
त्यामुळे धीरज हे या गोळीबारातून बचावले. याप्रकरणी धीरज आरगडे यांनी तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
View this post on Instagram
ठेक्याच्या वादातून आज पुन्हा गोळीबार
आज बुधवारी (ता.१७) पुन्हा शेवाळवाडी (ता. हवेली) येथे सिक्युरिटी गार्डच्या ठेक्याच्या वादातून पितापुत्रांनी दुसऱ्या ठेकेदारावर गोळीबार केल्याची घटना घडली. ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या दोन्ही घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.