पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन महिला पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीचा गळा आवळून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. हर्षद विकास पानसरे (वय ३६, रा. पोलीस लाईन, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षाच्या महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी (दि. २७) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथील त्यांच्या घरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि हर्षद पानसरे यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. हर्षद एका कंपनीत काम करण्यास आहे. विश्रांतवाडी पोलीस लाईनमध्ये ते दोघे राहण्यास आहेत. हर्षद हा फिर्यादींच्या चारित्र्याचा संशय घेऊन शिवीगाळ करून बदनामीकारक मेसेज पाठवून सतत वाद घालत असे. शनिवारी पहाटे त्याने फिर्यादीसोबत वाद करुन त्यांना गादीवर ढकलून, मी तुझा जीवच घेतो, असे म्हणून फिर्यादी महिलेचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पतीच्या तावडीतून आपली सुटका करुन घेत पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी हर्षद पानसरे याला ताब्यात घेतले. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.