लोणी काळभोर : कुटुंब देवदर्शनाला गेल्याची संधी साधून चोरट्याने घरफोडी करून घरातील रोख रकमेसह तब्बल तीन लाखाच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा जवळील चावट पाटील पार्कमध्ये 12 जून 2024 रोजी घडली आहे.
या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर (ता. हवेली) स्मशानभूमी जवळून मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून चार गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.
विजय लक्ष्मण गलांडे (वय 31, मूळ रा. नरसिंगपूर ता. इंदापूर, सध्या रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन कांतीलाल काळभोर ( वय 45, मुळ रा. काळभोरवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन काळभोर हे एक व्यावसायिक असून त्यांनी चावट पाटील पार्कमध्ये बंगला बांधला आहे. दरम्यान, काळभोर कुटुंब हे देवदर्शनाला गेले होते. त्यावेळी घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडला. व घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम 10 हजार रुपये व 4 तोळे वजनाचा सोन्याचा चोकर हार असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकातील पोलीस अंमलदार शैलेश कुदळे व योगेश पाटील यांना कुंजीरवाडी येथील घरपोडीच्या गुन्ह्यातील आरोपी विजय गलांडे हा थेऊर स्मशानभूमी जवळ येणार आहे. अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली.
दरम्यान, आरोपी विजय गलांडे यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपीने 4 गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपीकडून पोलिसांनी सदर गुन्ह्यातील 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 40 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद करणकोट यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देविकर, सुनील नागलोत, शैलेश कुदळे, चक्रधर शिरगीरे, बाजीराव विर, योगेश पाटील, व प्रदीप गडे यांच्या पथकाने केली आहे.