पुणे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगावात गुरुवारी टाकलेल्या धाडीमध्ये बांग्लादेशातून भारतात घुसखोरी करून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. या घुसखोरांना तातडीने अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, नारायणगावात बांग्लादेशी नागरिक बेकायदा राहात असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी एटीएसच्या (ATS) पथकाने नारायणगावात धाडी टाकल्या. यावेळी पथकाला ८ बांग्लादेशी नागरिक आढळून आले. हे सर्व नागरिक भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, एटीएसने या घुसखोरांना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतात घुसखोरी केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. बांगलादेशी नागरिक नारायणगाव परिसरात मजुरी करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
दरम्यान, एका आठवड्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि एटीएसने पुणे, ठाणे परिसरात कारवाई करुन आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या १५ जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती. तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी बुधवार पेठेत कारवाई करत तेथे वास्तव्य करणार्या बांग्लादेशी महिला आणि पुरुषांवर कारवाई करत त्यांना पकडले होते. मागील काही दिवसांपासून पुणे शहर व जिल्ह्यात बांग्लादेशी घुसखोरांची संख्या वाढत आहे. पोलिसांकडून या घुसखोरांविरोधात कारवाई केली जात आहे.