पुणे : शहरातील विमाननगर भागात असलेल्या ‘बॉटल बॅश’ पबमध्ये बुधवारी (ता.15) रात्री दीडच्या सुमारास दोन ग्राहकांनी मद्यपानाची मागणी केली होती. त्यावेळी वेटरसह पबमालकाने त्यांना मद्यपान करण्यास नकार दिला. त्यावेळी ग्राहकांनी जास्तच आग्रह केल्यामुळे त्यांना मद्य दिले. मात्र, ऑर्डर दिलेल्या मद्याचे ब्रँड आणि मापात पाप झाल्याची तक्रार करीत ग्राहकांनी बिल देण्यास टाळाटाळ केली. सुरुवातीला ग्राहकांनी दमबाजी केली. मात्र, नंतर ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले.
ग्राहकांनी दुचाकीवरून घरी जात असताना पबमालकाने पबमधील कर्मचाऱ्यांना घेऊन मोटारीने त्यांचा पाठलाग केला. तेव्हा मोटारीने दुचाकीला धडक दिली आणि त्यांना दुचाकीवरुन पाडले आणि त्यानंतर लाथाबुक्यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ससून रुग्णालयाचे मेडिकल सर्टिफिकेट असतानासुद्धा विमानतळ पोलीस गेली दोन दिवस तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे कमलेश चाबुकस्वार आणि अतुल गडकरी यांनी बोलताना सांगितले.
कमलेश चाबुकस्वार आणि अतुल गडकरी हे दोघे ‘बॉटल बॅश’ या पबमध्ये मद्यपानासाठी गेल्यानंतर त्यांनी टकाटक ब्रँडचे मद्य मागितले. परंतु, वेटरने त्यांना वोडका पॅक दिला. हा पॅक तीस मिली की साठ मिली, याबाबत त्यांना सांगितले नाही. दोघांनी दोन पॅक घेतले. त्यानंतर चाबुकस्वार आणि गडकरी यांनी बिल देण्यास नकार दिला. हॉटेलमध्ये मागितलेला ब्रँड आणि योग्य मापात मद्य न दिल्याने ते वाद घालू लागले. त्यानंतर दमबाजी करत शेवटी त्यांनी एक हजार तीनशे रुपये ऑनलाईन पेमेंट केले.
त्यावेळी कमलेश चाबुकस्वार आणि अतुल गडकरी हे दोघे दुचाकीवरून घरी जाण्यासाठी बाहेर पडले. याचवेळी पबच्या मालकाने मोटारीत चार ते पाच जणांना घेऊन त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या दुचाकीला मोटारीने धडक देऊन पाडले. त्यानंतर मालकासह चार ते पाच जणांनी चाबुकस्वार व गडकरी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये चाबुकस्वार बेशुद्ध पडला तर गडकरीच्या नाका तोंडातून रक्तस्राव होऊ लागला.
थोड्या वेळेने चाबुकस्वार आणि गडकरी हे दोघेही कसेबसे विमाननगर पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे गेल्यावर दोघांनी ठाणे अंमलदारांना घडलेला घटनाक्रम सांगितला. त्यावेळी पोलिसांनी ससूनचे मेडिकल सर्टीफिकेट आणण्याचे त्या दोघांना सुचवले. दोघेही ससूनमध्ये उपचार घेऊन तेथील डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेऊन आले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना सर्व हकिगत सांगितली.
त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी पबच्या मालकाला बोलावून घेतले. समोरासमोर घडलेल्या घटनेची शहानिशा केली. परंतु अद्याप गुन्हा दाखल केला नाही. पब मालकाने ग्राहकांना ‘दहा हजार रुपये घ्या तक्रार मागे घ्या,’ अशी विनंती केली. मात्र, चाबुकस्वार व गडकरी यांनी तक्रार करणारच, अशी भूमिका घेतल्याचे समजले.
पुणे शहर व उपनगरातील सर्व हॉटेल आणि पब हे रात्री एक वाजता बंद होतील, असा आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला आहे. तरीसुद्धा कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, खराडी परिसरात रात्री दीडनंतरसुद्धा पब तसेच हॉटेल सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत असतात.
यावेळी विमानतळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे म्हणाले की, या घटनेदरम्यान पब मालक व ग्राहकांमध्ये करार झाला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल केला गेला नाही. या विषयातंर्गत पोलीस ठाण्यात नंतर काय झाले याबद्दल माहिती नाही.