उरुळी कांचन, (पुणे) : मेहुणीबरोबर लग्न का केले नाही म्हणून 4 ते 5 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला व भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या तिघांना तलवार, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मीआई मंदीराजवळ, वडार वस्ती, बाजार मैदान जवळ मंगळवारी (ता. 28) रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
चैत्राली शिवाजी जाधव, प्रकाश कचरू पवार, अंजली कचरू पवार सर्व (रा. पांढरेमळा हडपसर), शिवाजी जाधव रा. वडारवस्ती बाजार मैदान उरुळी कांचन ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी अजय उर्फ प्रमोद भानुदास जाधव (वय 26) वर्ष धंदा मजुरी रा. लक्ष्मीआई मंदीराजवळ वडार वस्ती बाजारमैदान जवळ उरुळी कांचन ) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी जाधव व फिर्यादी अजय जाधव हे सख्खे भाऊ आहेत. तर चैत्राली जाधव भाऊजय आहे. चैत्राली हिची लहान बहिण आहे. शिवाजी जाधव व चैत्राली मागील एक वर्षापासून अजय याला लहन बहिणीसोबत लग्न कर असे सांगत आहेत. मात्र अजय हा लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता.
मंगळवारी (ता. 28) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भाउजय चैत्राली हिने चिडून जाऊन तिचा भाऊ प्रकाश पवार, बहिण अंजली पवार यांना हडपसर येथून बोलावून घेऊन लग्न न केल्याच्या कारणावरून भाऊ शिवाजी, भाउजय चैत्राली, प्रकाश पवार, अंजली पवार, यांनी अजयला हाताने, लाथा बुक्कयाने मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी प्रकाश पवार याने रिक्षातुन तलवार घेऊन आला. यावेळी वडीलांनी सर्वांना घरा बाहेर काढून अजय याला घरात थांबवुन ठेवले. प्रकाश पवार याने घरा बाहेर तलवार हवेत फिरवीत दहशत माजवत आज अजयला जिवेच मारतो अशी धमकी दिली.
दरम्यान, भांडणे सोडवण्यास गेलेले शेजारी असलेले सहदेव जाधव व बापु जाधव (रा. उरुळी कांचन ता. हवेली) यांचे हातास तलवार लागली तसेच पुजा जाधव हिला भावजय चैत्राली हीने मारहान व शिवीगाळ केली आहे. यावरून वरील चौघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार होले करीत आहेत.