उरुळी कांचन, (पुणे): पुणे जिल्हा क्रीडा परिषद, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा फुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक, विद्यालयाच्या 14 व 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दोन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. अजिंक्य कांचन व कार्यकारी संचालक डॉ. आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.

क्रीडा परिषद पुणे व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षीय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 26 संघ सहभागी झाले होते. यामध्ये अंतिम सामना हा डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक, विद्यालय उरुळी कांचन व ओलंपस स्कूल यांच्यात झाला. या सामन्यात अस्मिता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत विजय मिळवला व विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. आतापर्यंतच्या विद्यालयाची पहिल्यांदाच विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचा बहुमान मिळविला आहे. त्यामुळे विजेत्या विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
तसेच 14 वर्षीय वयोगटातील स्पर्धेचे आयोजन हे न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी (ता. आंबेगाव) या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 26 संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये 14 वर्षाखालील अंतिम सामना हा डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक, विद्यालय उरुळी कांचन व श्री रविशंकर विद्यालय यांच्यात रोमहर्षक झाला. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात अस्मिता विद्यालयाने बाजी मारत विजय मिळवला व विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
दरम्यान, विद्यार्थ्यांना प्राचार्या रोहिणी जगताप, उपप्राचार्य कांचन चव्हाण, क्रीडाशिक्षक शंकर वाईकर, संकपाळ सर यांनी देखील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन सचिव डॉ. अजिंक्य कांचन, कार्यकारी संचालक डॉ. आप्पासाहेब जगदाळे सर यांनी विद्यार्थ्यांवरती कौतुकाचा वर्षाव केला.







