पोपटराव पाचंगे
Ganpati News रांजणगाव गणपती, ता. ५ : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली. मात्र जतन व संवर्धनाच्या कामांमुळे मंदिर १५ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भाविकांसाठी बंद असल्याने यंदा भक्तांना प्रत्यक्ष दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. Ganpati News
महाराष्ट्र शासनाच्या अष्टविनायक आराखड्याअंतर्गत पुरातत्त्व विभागामार्फत मंदिराच्या जतन व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे मंदिर बंद असले तरी श्रींची नित्य पूजाअर्चा आणि धार्मिक विधी नियमितपणे पार पाडले जात आहेत. Ganpati News

अंगारकी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करण्यात आला. यानंतर भाविकांसाठी एलईडी स्क्रीनवर ‘लाईव्ह दर्शन’ची व्यवस्था करण्यात आली. महाद्वार परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. देवस्थान ट्रस्टकडून भव्य मंडप, केळीचा प्रसाद, तसेच पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली होती. Ganpati News
देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर यांनी सांगितले की, “भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एलईडीद्वारे दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.” Ganpati News
दरम्यान, दुपारी १२ वाजता मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य अर्पण करण्यात आला. मंदिर बंद असतानाही भाविक व ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ट्रस्टने आभार मानले असून, पुढील काळातही एलईडीद्वारे दर्शन घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, संतोष रणपिसे, रमाकांत शेळके व अन्य कर्मचारी उपस्थित होते.







