पुणे: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा असतानाच उद्घाटनाला पुन्हा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर नाका ते नांदलापूरदरम्यान उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी काही महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापूर नाक्याजवळ वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा पूल सुरू झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुण्याकडून येताना कराडमधील प्रसिद्ध पंकज हॉटेल परिसरापासून नांदलापूरपर्यंत हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. सुमारे 3.47 किलोमीटर लांबी आणि 29.5 मीटर रुंदी असलेल्या या पुलासाठी 115 सिमेंटचे भव्य खांब उभारण्यात आले आहेत. पूल सुरू झाल्यानंतर लांब पल्ल्याच्या वाहनांना शहरातील अंतर्गत रस्त्यांवर न जाता थेट प्रवास करणे शक्य होणार आहे.

मात्र, पुलावरील डांबरीकरण, डिव्हायडर बसविणे, दिशादर्शक फलक उभारणे तसेच सुरक्षाविषयक काही कामे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. याशिवाय इंधन आणि गॅस उपलब्धतेच्या अडचणींमुळे कामाच्या गतीवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
सध्या शनिवार-रविवार तसेच सुट्टीच्या काळात गोवा, कोकण, कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे कराड परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. बाहेरून येणाऱ्या वाहनांचा ताण स्थानिक रस्त्यांवरही पडत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, यापूर्वीही हवामान, तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची मुदत अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता हा उड्डाणपूल नेमका कधी सुरू होणार, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.







