पुरंदर: राज्य लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये पिंपळे (ता. पुरंदर) येथील आशिष विठ्ठल खेनट हे राज्यामध्ये पंधरावी रँक प्राप्त करत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांना डीवायएसपी पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन जिद्दीच्या आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याचा पोरगा साहेब झाला, अशी भावना ग्रामीण भागामध्ये सर्वत्र दिसत आहे. खेनट यांचे वडील विठ्ठल नारायण खेनट यांनी शेती व्यवसाय सांभाळत आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. एक मुलगा मंत्रालयामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे, तर दुसरा मुलगा डीवायएसपी पदावर काम करणार आहे.
आपल्या दोन्ही मुलांचे हे यश पाहून आई-वडिलांना त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटत आहे. मुलाचे हे यश पाहून खेनट यांच्या आई शालन खेनट यांना तर आनंदाश्रू आवरता येत नाहीत. मिळालेल्या घवघवीत यशासाठी व मेहनतीसाठी आशिष यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सर्वच क्षेत्रातून होत आहे.