पिंपरी : पुण्यासह जिल्ह्यात चोरीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता पिंपरी चिंचवड शहरातून एक चोरीची घटना समोर आली आहे. मालक देवदर्शनासाठी गेल्यानंतर नोकराने ज्वेलर्सच्या दुकानातील दागिने आणि रोकड असा १ कोटी ३७ लाख ८० हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना पिंपळे गुरव येथील वर्षा ज्वेलर्स दुकानात ३ ते ८ नोव्हेंबर २०२४ या कालवधीत घडली आहे.
याप्रकरणी मतेश रणजितमल जोधावल (वय ३५, रा. मंगळवार पेठ, पुणे) यांनी शनिवारी (दि. ९) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी डुंगर राजू सिंग (२७, रा. कुंडा, जि. जैसलमेर, राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मतेश जोधावल यांचे दाजी नितीन पारेख यांचे पिंपळे गुरव येथे वर्षा ज्वेलर्स नावाने दुकान आहे. या दुकानात डुंगर सिंग हा कामाला होता. नितीन पारेख हे देवदर्शनासाठी गेले. त्या वे त्यांनी त्यांच्या दुकानातील सर्व सोन्या चांदीचे दागिने व दुकानाचे सर्व आर्थिक व्यवहार दुकानातील नोकर डुंगर सिंग याच्याकडे विश्वासाने सोपविले.
दरम्यान, डुंगर सिंग याने दुकानातील एकूण १८६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व तीन लाख ५० हजार रोख रक्कम असा एकूण एक कोटी ३७ लाख ८० हजार ९०० रुपयांचा ऐवज पळवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते तपास करीत आहेत.