Pune Armed Robbery : पुण्यात एका वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा टाकून तब्बल ३ लाख १२ हजारांची रोकड लंपास केली आहे. ही धक्कादायक घटना शिवणे येथील एनडीए (NDA) रस्त्यावर असलेल्या आर. आर. वाईन्स दुकानात घडली आहे. याप्रकरणी मनोज बाळासाहेब मोरे (वय ३३, रा. कृष्णा रेसिडेन्सी, कोंढवे धावडे) यांनी फिर्याद दिली असून सहा अज्ञात आरोपींविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात गोळीबार, खून आणि खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे वाढलेले असतानाच आता गुन्हेगारांची मजल सशस्त्र दरोडे टाकण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित आहे की नाही असा सवाल केला जात आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मनोज मोरे हे एनडीए रस्त्यावर असलेल्या कोहिनूर चौकामध्ये असलेल्या आर. आर. वाईन्स या दुकानात मॅनेजर पदावर काम करतात. मोरे दुकानात रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ग्राहकांना मद्य विक्री करत होते. यावेळी अन्य कामगार देखील दुकानात हजर होते. तेव्हा चार जण दोन दुचाकी घेऊन आले आणि दुकानात शिरले. त्या पैकी एकाने पिस्तूल बाहेर काढून मोरे यांच्यावर रोखून धरले.( Pune Armed Robbery)
त्यांच्याकडे खंडणीची मागणी करत गोळी झाडण्याची धमकी दिली. घाबरलेले मोरे जीव वाचविण्यासाठी दुकानातुन बाहेर पळाले. दरम्यान, दोघा चोरटयांनी धारदार तलवारी बाहेर काढल्याने अन्य कामगार देखील दुकानाबाहेर पळाले. यावेळी दुकानात शिरलेल्या चार चोरट्यांनी काऊंटरवरुन उड्या मारत दुकानात प्रवेश करून ड्रॉव्हरमधले पैसे पिशवीमध्ये भरले.
चोरट्यांनी तब्बल ३ लाख ९ हजार रुपयांची रोकड घेऊन हवेत तलवारी फिरवत दहशत निर्माण करून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त भीमराव टेळे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे, उत्तमनगरचे वरिष्ठ निरीक्षक किरण बालवडकर घटनास्थळी दाखल झाले.(Uttamnagar Police)