लोणी काळभोर, (पुणे) : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील मुलीच्या गटामध्ये शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी अनुष्का काळभोर हिने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर 14 वर्षाखालील मुलांच्या गटामधून इयत्ता 6 वी मधील गुरुराज वलांडे याने 5 पैकी 5 ही फेऱ्या जिंकून घवघवीत यश मिळवले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भूमकर कॉलेज, लोणीकंद हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी रेनबो इंटरनॅशनल स्कूलमधून 5 मुले व 5 मुली सहभागी झाले होते.
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये रेनबो इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी अनुष्का काळभोर हिने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच या स्पर्धेतील सई काळभोर व रेवा पाटील या विद्यार्थिनीची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 14 वर्षाखालील मुलांच्या गटा मधून इयत्ता 6 वी मधील गुरुराज वलांडे याने 5 पैकी 5 ही फेऱ्या जिंकून घवघवीत यश मिळवले आहे.
दरम्यान, या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक निखिल जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. हायस्कूलच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष नितीन काळभोर, प्राचार्या मीनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे यांनी कौतुक केले. चारही यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पंचक्रोशीतून पालक, ग्रामस्थ यांच्याकडून शाळेचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.