पुणे: पुण्यातील भवानी पेठ भागात क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये फ्री-स्टाईल हाणमार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भवानी पेठेतून एक तरुण दुचाकीवरून जात असताना त्याने समोरून रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला हॉर्न दिला. याचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीने दुचाकीस्वार तरुणाशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर हे प्रकरण अधिकच वाढलं आणि या वादाला हिंसक वळण लागलं. व्हिडिओमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी होताना दिसत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अधिक तपास खडक पोलीस ठाण्याच्या पथकाकडून केला जात आहे.