पुणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने खुले आव्हान दिले आहे. बंद पाकिटातील नोटांचा नंबर ओळखल्यास धीरेंद्र शास्त्री यांना आम्ही 21 लाख रुपये देऊ, एवढेच नव्हे तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमस्वरूपी बंद करू, असे खुले आव्हान अंनिसचे सदस्य मिलिंद देशमुख यांनी दिले. या आव्हानावर धीरेंद्र शास्त्री महाराज काय प्रतिवाद करणार?, आव्हान खुलेआम स्विकारणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या पुण्यात होणार्या सत्संग आणि दिव्य दरबार कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महाराष्ट्र अंनिस) विरोध केला होता. त्यावर 20 नोव्हेंबर या दिवशी बागेश्वर बाबा यांनी समितीला खुले आव्हान दिले. ते म्हणाले, ‘माझ्या दरबारामध्ये या, तुमचे काय म्हणणे आहे ते मांडा. आपण ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ करू, एकदाच आमने-सामने होऊन जाऊ द्या’, असे थेट आव्हानही त्यांनी दिले. तसेच ‘भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी राज्यघटनेत पालट केला पाहिजे’, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. त्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज आणि अंनिस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता थेट अंनिसने खुले आव्हान दिले आहे.
अंनिसचे सदस्य मिलिंद देशमुख म्हणाले की, धिरेंद्र शास्त्री यांनीच समोर यावं. आम्ही दरबारात येणार नाहीत. सर्वांसमोर सोक्षमोक्ष लागेल. आम्ही त्यांची एक परीक्षा घेऊ त्यात ते पास होतील की नाही बघुयात. बंद पाकिटातील आम्ही सांगितलेल्या नोटांचा नंबर ओळखल्यास आम्ही त्यांना 21 लाख रोख बक्षीस म्हणून देऊ आणि अंधश्रद्धा निर्मूलन संस्था कायमची बंद करू, असे आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे खुले चॅलेंज धीरेंद्र शास्त्री महाराज यांना दिले आहे. धीरेंद्र शास्त्री महाराज हे आव्हान स्वीकारतील असे वाटत नाही. कारण ते केवळ दरबारात असे बोलू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.