उरुळी कांचन: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथे बाराही महिने अठरा तास वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा नागरिकांसह वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासन काही न करता ढिम्मच आहे. तर नागरिकांच्या या समस्येकडे खासदार, आमदारांसह पूर्व हवेलीतील शेकडो पुढाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनासह राजकीय नेत्यांवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करून पुढाऱ्यांना वाहतूक कोंडी दिसत नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडी सातत्याने होत असल्याने वाहनांच्या रांगा अगदी दोन, तीन किलोमीटरवर लागत आहे. उरुळी कांचन गावात जाण्यासाठी दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. तळवाडी चौकातून जेजुरीकडे जाण्यासाठी अगदी एक ते दीड तास लागतो. तळवाडी चौकात रस्त्यातच बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मोठी वाहने, खासगी वाहने थांबतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा सेवा रस्ता टपरी चालक व हातगाड्यांनी व्यापला आहे. मात्र, स्थानिक दुकानदारांच्या दबावापोटी उरुळी कांचन पोलिस, उरुळी कांचन ग्रामपंचायत व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कारवाई करत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
उरुळी कांचन हे गाव आता पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात आहे. यापूर्वी पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येत होते. पुणे शहर पोलिसांचा भला मोठा ताफा असतानादेखील उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अयशस्वी ठरले होते. आता ग्रामीण पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात असतानादेखील प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील झाला आहे.
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
पुणे-सोलापूर महामार्गाबाबत खासदार व आमदार कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, तसेच इतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, या पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारील गावात राहत आहेत. तसेच विविध मोठमोठी पदे घेऊन मिरवणारे अनेक नेते याच पुणे-सोलापूर महामार्गावरील गावात राहतात. मात्र, नागरिकांना होणारा त्रास यांना दिसत नसल्याचे वास्तविक चित्र सध्या पूर्व हवेलीत दिसून येत आहे.
अवैध प्रवासी वाहनांचा महामार्गावरच थांबा
हडपसरहून लोणी काळभोरमार्गे यवत, चौफुल्याला जाण्यासाठी तीन-चाकी रिक्षांपासून टेम्पो आणि कारमध्ये देखील बिनधास्त बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू असते. या अवैध प्रवासी वाहतुकीचा वाहतूक कोंडीत भर पडत आहे. उरुळी कांचन, तळवडी चौकातील रिक्षा व काही टेम्पो हे सेवा रस्त्यावर थांबतात. या रिक्षा व टेम्पो यांना स्वतंत्र वाहनतळ नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
पार्किंग करा आणि बिनधास्त राहा..!
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर कोठेही पार्किंग करा आणि बिनधास्त राहा, असे विदारक चित्र निर्माण झाले आहे. तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढत आहे. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुकाने तसेच पथारीवाले, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे खरेदीदारांची तसेच इतरांची वाहने मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने पार्किंग केली जातात. पार्किंग करताना वाहने अस्ताव्यस्तपणे लावली जातात. त्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.