दौंड: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचार शिगेला पोहचला आहे. काही मतदारसंघात चुरशीची आणि रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात पुन्हा एकदा आमने-सामने आहेत.
दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार राहुल कुल पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी आक्रमक प्रचार करत आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात हे महायुतीला धक्का देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत आहेत. राहुल कुल यांनी मागील काही दिवसापासून त्यांनी तालुक्यात विविध विकास कामांचा उद्घाटनाचा सपाटा लावला होता. तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लावल्याचा दावा कुल करीत आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भक्कम साथ देखील आहे. आता अजित पवार यांच्या रूपाने आणखी मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे. त्यामुळे आमदार कुल यांचा विश्वास चांगलाच दुणावला आहे.
दुसरीकडे माजी आमदार रमेश थोरात हे देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. त्यांनी तुतारी हाती घेताच तालुक्यात विकास कामांच्या केवळ पोकळ गप्पा आहेत. निकृष्ट दर्जाची कामे झाली असून आपल्याच बगलबच्चांना जगवण्याचे काम कुल यांनी आतापर्यंत केले आहे, असा आरोप करत रणसिंग फुंकले आहे. प्रचारात दौंड तालुक्यान शैक्षणिक संकुल नाही. बेरोजगारी पर्यायाने व्यसनाधीनता व गुन्हेगारीतही वाढ, कुरकुंभ एमआयडीसीत भूमिपुत्रांना नोकरी नाही. औद्योगिक पट्ट्यातील ठेकेदारीत गुन्हेगारी टोळ्यांचा शिरकाव, युवा वर्गाला शिक्षण व नोकरीसाठी दररोज पुणे येथे जावे लागत आहे. भौगोलिक परिस्थिती व दळणवळण सुसह्य असताना नियोजन नाही. कुरकुंभ एमआयडीसीमुळे वायू व जल प्रदूषण. भीमा पाटस कारखान्याचे खासगीकरण, दौंड शहरातील नगरपालिकेच्या अडीच कोटी रुपयांच्या कत्तलखान्याला वाढता विरोध यासारखे मुद्दे जोरकसपणे मांडले जात आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीत ‘तुतारी’वर निवडणूक लढविणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना दौंड विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ३३७ मताधिक्य मिळाल्याने थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा उत्साह वाढला आहे.
दरम्यान दौंडमधून गेल्या २० वर्षांपासून विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येऊ शकलेला नाही. येथे राष्ट्रवादीच्या चिन्हावर रंजना कुल या निवडून आलेल्या शेवटच्या आमदार आहेत. त्यानंतर मात्र दौंडमध्ये राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकलेला नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला गेली ११ वर्षांपासून मताधिक्क्य मिळू शकलेले नाही. शेवटी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारीवर लढणाऱ्या सुप्रिया सुळेंना या निवडणुकीत मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे दौंडमध्ये घड्याळ का चालत नाही, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही पडलेला असू शकतो. आता मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह तुतारी असल्यामुळे त्यांना यश मिळते? ते पाहणे देखील महत्वाचे आहे.