पुणे : पहिल्याच टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न मिळाला म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पोटात दुखतं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला देखील 10 बाय 10 च्या खोलीत संसदरत्न पुरस्कार मिळाला असेल तर हीच भूमिका तुमची असेल का? असा सवाल अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना करत जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
शिरूर मतदार संघात येणाऱ्या हडपसर परिसरात खासदार अमोल कोल्हे आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सर्व नेते पाठीशी आहेत. भाजप आणि महायुती विरुद्ध जनता निवडणुकीत उतरली आहे. आढळराव पाटील यांनी पंधरा वर्षांत किती निधी आणला हे त्यांनी जाहीर करावं. मी मतदारसंघात 19 हजार 500 कोटी रुपये निधी आणू शकलो त्याचा मला आनंद आहे. तसेच आढळराव पाटील यांनी मतदारसंघात गेल्या १५ वर्षांत एक मोठा प्रकल्प आणलेला दाखवावा हे माझं त्यांना खुलं आव्हान असल्याचेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी फक्त एकच उत्तर द्यावं कि, लोकांनी 15 वर्षे निवडून दिलं. त्यांना का बैलगाडा शर्यत सुरु करता आली नाही. ही बैलगाडा शर्यत का 7 वर्षे बंद होती? मी एवढे वर्षे अभिनय क्षेत्रात काम करतो. मात्र इतक्या पटकन कधीही भूमिका बदलण्याचं माझ्या पाहण्यात नाही. आढळराव पाटील यांनी इतक्या पटकन भूमिका बदलली याला मी सलाम करतो. नावडतीचे मीठ आळणी असे म्हणत पहिल्याच टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न मिळाला म्हणून आढळराव पाटील यांच्या पोटात दुखतं आहे.
तुतारीला मत म्हणजे शरद पवारांना मत. महायुती महाराष्ट्रात टिकेल की नाही यावर शंका आहे, घड्याळाला फक्त 4 ते 5 जागा वाट्याला याव्या आणि त्यातही एक घरात 2 आयात, एक प्रदेशाध्यक्ष असे उमेदवार द्यावे लागतात. त्यातही दिल्लीवारी करूनही केवळ 4 ते 5 जागांवर समाधान मानावं लागतं. चॅलेंज देणारे नेते मोठे आहेत, यापूर्वी त्यांच्यामागे शरद पवार होते. ते मोठे नेते आहेत. आम्ही सर्वसामान्य आहोत, आम्हाला लढायचं कळतं, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.