पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ही घटना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आनेवाडी येथील टोलनाक्याजवळच असलेल्या रायगाव फाटा परिसरात घडली आहे. रुग्णवाहिका आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरची जोरदार धडक झाली. या धडकेत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमचे सदस्य संतोष पवार (वय-२८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पवार हे पुणे येथे रुग्ण सोडून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते, त्यावेळी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील संगम माहुली येथील संतोष पवार हे गुरुवारी दुपारी रुग्णाला सोडण्यासाठी पुणे येथे गेले होते. रात्री पुण्याहून साताऱ्याकडे येत असताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्याजवळ रायगाव फाटा येथे आले असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला मागून जोराची धडक दिली. या धडकेत पवार हे गंभीर जखमी झाले.
ही घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत तातडीने सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री दीडच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष पवार हे श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकाचालक म्हणून काम पाहत होते. तसेच संतोष पवार यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते गेली दहा वर्ष छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे सदस्य होते. रेस्क्यू टीम करीत असताना त्यांनी अनेक जणांचे जीव वाचवले होते.