पुणे: महाराष्ट्रात दोन जानेवारी म्हणजे मंगळवारपासून पेट्रोल पंप चालक संपावर जाणार असून त्यामुळे पंप बंद राहणार असल्याची अफवा जोरात पसरली होती. यानंतर वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरुन घेण्यासाठी पंपावर ठिकठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे. (Pune petrol diesel association) या पार्श्वभूमीवर आता पेट्रोल-डिझेल असोसिएशनने एक प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. संपावर जाऊन पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा संघटनेचा कुठलीही योजना नाही, त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील विविध भागात संपाच्या या अफवेमुळे पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, या भीतीपोटी पंपावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. सोमवारी राज्यात सरकारच्या नवीन कायद्या विरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला. नागपूरात शहरातील पेट्रोल पंपांवर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी मोही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. एरव्ही पेट्रोल पंपावर अवघी दोन-चार वाहने दिसत असताना आज मात्र पेट्रोल पंपावर एकच गर्दी दिसत आहे.
या दरम्यान, पुण्यातील पेट्रोल-डिझेल असोसिएशनने संपाची अफवा पसरल्यानंतर एक प्रसिद्धीपत्रक काढून यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना आमची विनंती आहे की, कोणत्याही अफवांमुळे अथवा बातम्यांमुळे पॅनिक होऊ नका. पुणे शहर आणि जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी संघटना बांधील आहे, असे पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी सांगितले. (Pune petrol diesel association)