आळंदी : आळंदी देवस्थानच्या विश्वस्त समितीची निवड करताना ग्रामस्थांना डावलल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. ५) ग्रामस्थांनी बैठक घेऊन आळंदी बंद पुकारला आहे. यादिवशी दळणवळण आणि व्यापार बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदीतील प्रदक्षिणा मार्गाने निषेध मोर्चा काढून महाद्वार सभेचे आयोजन केले आहे. या बाबतचे निवेदन ग्रामस्थांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांना दिले.
आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा मंगळवारपासून सुरु होत आहे. या दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून स्थानिकांनाही स्थान मिळावे यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंगळवारी आळंदी बंद पुकारला आहे. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरी देखील संबंधित प्रशासनाने स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशी वर नवीन तीन विश्वस्तांची नेमणूक केली आहे. तत्कालीन विश्वस्तांना देखील मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून दिली आहे. आळंदी ग्रामस्थांच्या वतीने याचा तीव्र निषेध करण्यात आला. प्रशासनाने लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी आळंदी ग्रामस्थांनी दिला आहे.
देवस्थानवर विश्वस्त पदासाठी आळंदीकरांनी अर्ज केले होते. मात्र, मुलाखती झाल्यानंतर एकाही आळंदीकरांची निवड केली नाही. त्यामुळे बंद ठेवण्यात येणार आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडेही दोन आठवड्यांपूर्वी नेमलेल्या तीन विश्वस्तांच्या नेमणुकीवर हरकत घेतल्याचे निवेदन रवींद्र पाटील यांना दिले आहे. विश्वस्त मंडळात स्थानिक ग्रामस्थांनाही स्थान देण्यात यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासंबंधी ग्रामस्थांकडून प्रशासनाला पत्रव्यव्हार देखील केला होता, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशीनुसार आणखी नव्या तिघांना विश्वस्त मंडळात स्थान दिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. संबंधित मागणीसाठी ग्रामस्थांनी एकमत करून उद्या आळंदी बंद पुकारला आहे.
मागण्या मान्य न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. प्रशासन स्थानिकांच्या मागणीची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.