पुणे : मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये केलं होतं. या वक्तव्यामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावरच आता खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या अजित पवार यांनी मोक्का लागण्यापासून एखाद्याला वाचवलं असेल तर हे धक्कादायक आहे. या प्रकारचं सरकारने उत्तर द्यायला हवं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक आहे. त्यांनी नेमकं कोणाला वाचवलं?, कोणत्या केसमधून वाचवलं?,आणि एवढ्या मोठ्या मोक्कामधून वाचवण्याची कारणं कोणती होती? याची माहिती द्यायला हवी आणि सोबतच सरकारनेदेखील याचं उत्तर द्यायला हवं. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
आता बारामतीमध्ये एका माणसाचे नाव सांगा जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. माझे सहकारी आले त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा मला वाचवा. त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही.
मला अधिकारी म्हणाले दादा तुम्ही एवढ कडक वागतात आणि अशा गोष्टीला कस पाठीशी घालतात? तेव्हा माझापण कमीपणा होतो. पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते, असं अजित पवार बारामतीत म्हणाले होते.