बापू मुळीक
सासवड : शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेमार्फत फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी वारंवार आव्हान करण्यात येत आहे. परंतु सुविधा केंद्रावर फार्मर आयडी काढण्यासाठी गेल्यानंतर, अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. प्रशासनाकडे तक्रार करूनही, अडचणी दूर होत नाहीत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 लाख 83 हजार 769 फार्मर युनिक आयडी काढण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे सरकारी योजनेसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ‘ॲग्रीस्टॅग’ बनवणे आवश्यक आहे.
प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅग प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्यांना पीएम किसान, पिक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. तालुका निहाय फार्मर युनिक आयडीची आकडेवारी जुन्नर. 67 231, शिरूर. 55 674, दौंड. 54 187, इंदापूर. 44 565, आंबेगाव. 40022, पुरंदर. 38 393, खेड. 38042, भोर. 25 332, मावळ. 23056, मुळशी. 17 875, हवेली. 17 700, राजगड. 8406, पुणे शहर. 33, पुणे जिल्ह्यात शेत जमीन आधारशी संलग्न करून, फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावावर असलेली सर्व शेत जमीन आपल्या आधारशी संलग्न केल्यानंतर, त्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे. परंतु फार्मर आयडी काढताना फार्मर आयडीच्या वेबसाईटवर शेतकऱ्याचे नाव येत नाही. कधी सातबाराच दिसत नाही, तर कधी गट क्रमांक येत नाही, याशिवाय हा अर्ज भरताना मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेत अर्ज भरायचा असल्याने, मराठी नाव टाकले तर इंग्रजी नाव मॅच होत नाही. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील अर्ज सबमिट होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा फार्मर आयडी निघत नाही. अशी शेतकरी यांनी व्यथा एकप्रकारची मांडली आहे.
बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे फार्मर आयडीचे झाले आहेत. एखाद्या गावामध्ये एकाच नावाचे दोन व्यक्ती असल्यामुळे, अडीअडचणी ज्या येत आहेत. त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सध्यातरी पुरंदर तालुक्यात शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्यासाठी अडचण येणार नाही.
-सुरज जाधव (कृषी अधिकारी पुरंदर तालुका)