पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरवात केली आहे. कोणत्याही निवडणुकीत एकीकडे राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे खुमासदार चर्चाही रंगत असतात. अशीच एक चर्चा आता अजित पवारांच्या एका विधानावरून रंगू लागली आहे. कारण या चर्चेला संदर्भ जोडला जात आहे तो थेट देवेंद्र फडणवीसांच्या एका विधानाचा!
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेलं एक भाषण बरंच प्रसिद्ध झालं होतं. त्यात देवेंद्र फडणवीसांनी “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” असं म्हणत निवडणुकीतील विजय पक्का असल्याचा दावा केला होता. पुढील प्रचारसभांमध्ये सातत्याने फडणवीसांनी याच उक्तीचा पुनरुच्चार केला होता. पक्षाच्या बॅनर्सवरही देवेंद्र फडणवीसांचं हेच विधान पाहायला मिळालं होतं. आता अजित पवारांनीही तशाच स्वरुपाचं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत आपला विजय पक्का असल्याचं विधान अजित पवार यांनी केलं आहे. बारामती मतदारसंघातील झारगरवाडीत प्रचारादरम्यान त्यांनी काही मतदारांशी संवाद साधला. बारामतीच्या विकासाच्या जोरावर विजयी होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. “मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. या निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तालुक्याचा अधिक फायदा होण्याच्या दृष्टीने उद्या काहीही झालं तरी महायुतीचं सरकार येणार येणार येणार. सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला तिथे चांगलं पद मिळणार मिळणार मिळणार”, असं विधान अजित पवार यांनी केलं.
अजित पवारांच्या या विधानाचा संदर्भ थेट देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विधानाशी लावला जात असून त्याच प्रकारचं अजित पवारांचं हे विधान असल्याचाही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीमधील यंदाची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या विरोधात बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)गटानं युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये काका विरोधात पुतण्या अशी लढत होणार आहे.