पुणे : पुण्यात विकसकाकडून एका महिलेने तीन फ्लॅट विकत घेतले. विकसकाने त्याची स्टॅम्प ड्यूटीही भरली. मात्र, त्या फ्लॅटचे पूर्ण पैसे देण्यापूर्वीच या महिलेने हे फ्लॅट इतरांना विकून ८७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रफिक सालेमोहम्मद जाफरानी (वय ६२, रा. सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी नूतन दिलीप शिनोलीकर (वय ३९, रा. धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात ३० मार्च २०२० ते आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांनी विकसित केलेल्या हेमी पार्क या सोसायटीमधील तीन फ्लॅट नूतन शिनोलीकर यांनी १ कोटी ३१ लाख ५१ हजार ९०४ रुपयांना विकत घेतले होते. त्याची स्टॅम्प ड्यूटी देखील ८ लाख २७ हजार १०० रुपये फिर्यादी यांनी भरली होती.
शिनोलीकर यांनी फिर्यादी यांना ५२ लाख ५० हजार रुपये दिले. उर्वरित ८७ लाख २९ हजार रुपये देणे बाकी असताना त्यांनी हे फ्लॅट इतरांना विकून मिळालेली रक्कम स्वत: वापरून फिर्यादीची फसवणूक केली. सहायक पोलिस निरीक्षक भाबड तपास करत आहेत.