पुणे : पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात हिट अँड रन प्रकरणाच्या घटना सतत घडत आहेत. अशातच आता गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या पुणे पोलिसांनाच मारहाण केली जात असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुणे शहरात पोलिसच असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.
फुरसुंगीतील तुकाई टेकडी परिसरात तरुणाने मुलीचा हात ओढल्याप्रकरणी महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचारपूस करणाऱ्या पोलिस अंमलदाराला बहीण-भावाने शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना पोलिस चौकीत बोलाविल्याचा राग आल्याने दोघांनी पोलिसाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.
ही घटना शनिवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगीतील तुकाई टेकडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी बहीण-भावाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील दिनेश सुरवाडे (वय-२०) आणि पूजा दिनेश सुरवाडे (वय-२५ रा. काळेपडळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस अंमलदार सागर सूर्यवंशी यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईद ए मिलाद मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलिस अंमलदार सागर सूर्यवंशी हे जुनी म्हाडा कॉलनी परिसरातून जात होते. त्यावेळी तुकाई टेकडी परिसरात एकाने मुलीचा हात पकडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टीने सूर्यवंशीने त्यांना विचारपूस केली.
त्यांच्याकडे चौकशी केल्याचा राग आल्यामुळे सुरवाडे बहीण-भावाने पोलिसांना शिवीगाळ केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलिस चौकीत बोलाविले. त्या ठिकाणी दोघांनीही पोलिस अंमलदार शेलार यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.