पुणे : निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मिळालेल्या नवीन तुतारी चिन्हाचे लॉंचिंग रायगडावर करण्यात आले. त्यासाठी शरद पवार रायगडावर दाखल झाले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला. शरद पवारांनी 40 वर्षांनी रायगड गाठला, याचं क्रेडिट अजितदादांना द्यावं लागेलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला ते भेट देण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यामांशी बोलताना म्हटले की, ‘अजित पवारांमुळे शरद पवारांना रायगडावर जावं लागलं. आता तुतारी कुठे आणि किती वाजते हे पाहावं लागेल’.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की शेवटी 40 वर्षानंतर पवार साहेब रायगडावर गेले. अजित दादांना एका गोष्टीचं तर क्रेडिट द्यावचं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर अजितदादांमुळे शरद पवारांना रायगडावर जावं लागलं. आता तुतारी कुठे वाजते कशी वाजते ते आपल्याला भविष्यात देखील दिसेलच’, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे.
पुणे पोलिसांचे अभिनंदन
‘पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला. या कामगिरीसाठी पुणे पोलिसांचे विशेष अभिनंदन त्यांनी केले आहे. ज्याप्रकारे त्यांनी ड्रग्सचा हा संपूर्ण साठा शोधून काढला. नो टॉलरन्स फॉर ड्रग्स अशा पद्धतीची पॉलिसी राबवली. त्याचप्रमाणे सगळ्या युनिट्सला अशा सूचना देण्यात आल्या आहेत की, केवळ ज्या ठिकाणी मुद्देमाल मिळतो त्या ठिकाणीच कारवाई सिमीत न ठेवता त्याचे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज हे देखील शोधून काढा. याचे धागेदोरे राज्यातील अनेक ठिकाणी आहेत. हे पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे सामोर आले आहे.