लोणी काळभोर, (पुणे) : नातेवाईकांना सतत त्रास देत असल्याच्या संशयावरून कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात भिक्षा मागणाऱ्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी बाबु जाधव याला अटक केली होती. सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात न्यायालयाने आरोपीला ६ वर्षानंतर ६ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश बी. पी. क्षीरसागर यांनी दिले आहेत.
बाबु उर्फ हरीचन लक्ष्मण जाधव (वय-२० रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर राजा धोंडीबा माळी (वय-५०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, मुळ रा. शितोळेवस्ती कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कदमवाकवस्तीच्या पोलीस पाटील प्रियांका श्रीकांत भिसे (वय-३०) यांनी लोणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर प्रकार हा १६ सप्टेंबर २०१८ रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा माळी हा बऱ्याच वर्षापासून कदमवाकवस्ती परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, पुणे-सोलापुर रेल्वे लाईनच्या परीसरात मांजरी बु।। ते झगडेवस्ती रोडवरील रेल्वे पुलाखाली राजा माळी याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा व लाकडी दंडुक्याने मारहाण करून खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.
याप्रकरणी कदमवाकवस्तीच्या पोलीस पाटील प्रियांका भिसे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खुनाच्या गुन्हाचा छडा लावून लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी बाबु जाधव याला अटक केली होती. दरम्यान, या गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील राजेश कावेडी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी बाबु जाधव याला ६ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश बी. पी. क्षीरसागर यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील राजेश कावेडी यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलिस निरीक्षक एम के ढवाण, पोलीस हवालदार ललिता कानवडे, अजिनाथ शेलार, पोलीस अंमलदार सोमनाथ गळाकाटे व सर्जेराव धडस यांची मदत मिळाली.