हडपसर, (पुणे) : शिवाजीनगर कोर्ट परिसरातून पळून गेलेल्या मोका गुन्ह्यातील आरोपीला हडपसर पोलिसांनी बीड येथून अटक केली आहे. राजेश रावसाहेब कांबळे (वय ३७, रा. सर्वे नं १०६, गोसावी वस्ती, हडपसर पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी कांबळे याच्या विरोधात दरोड्याची तयारी, तसेच विविध गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी तो २०१४ पासून येरवडा कारागृहात होता.
दरम्यान, स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने येरवडा कारागृहातून न्यायालयात नियमीत पेशी करीता २ ऑगस्ट २०२३ रोजी राजेश कांबळे याला पोलीस बंदोबस्तात घेवून गेले होते. न्यायालयातून येरवडा कारागृहात परत नेताना आरोपी कांबळे याने रस्त्यात तहान लागली असून, पाणी देण्याची विनवणी केली. यावेळी तो पोलीस पथकाच्या कायदेशीर रखवालीतुन पळून गेला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांचे तपास पथक आरोपीचा शोध घेत होते. यावेळी एका खबऱ्याकडून हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप राठोड आणि अजित मदने यांना फरार झालेला आरोपी बीड येथ लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास पथकाने सापळा रचून आरोपी राजेश कांबळे याला बीड येथून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीकामी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदीप शिवले यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने केली आहे.