लोणी काळभोर, ता. 28 : नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत अटक केली आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या या दबंग कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमन शकील शेख (वय 21, रा.कदमवाकवस्ती, ता.हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 9 वर्षाच्या निर्भयाच्या 30 वर्षीय आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्भया ही रविवारी (ता.20) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरी एकटी होती. तेव्हा आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला त्याच्याजवळ ओढले. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याशी छेडछाड करून अत्याचार केला. याप्रकरणी निर्भयाने या बॅड टच बाबतची घडलेली हकीकत तिच्या आईला सांगितली. त्यानंतर निर्भयाच्या आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान, याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 75 सह व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा काढला. त्यानंतर सदर ठिकाणी छापा टाकून आरोपाला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, दिगंबर सोनटक्के, सर्जेराव बोबडे, पोलिस अंमलदार किशोर कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.