लोणी काळभोर, ता. 8 : दुसऱ्या समाजाच्या मुलीबरोबर प्रेम सबंध ठेवु नको असे सांगितल्याच्या रागातून, मामी, तिची दोन मुले व एका नातेवाईकावर खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पाटीलवस्ती परिसरात जून 2016 साली घडली होती. या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला होता. तर तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या गुन्ह्यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
विठ्ठल बाबासाहेब गुंड (वय 31 रा. गुंडेवाडी ता.आष्टी.जि बीड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर बाळकृष्ण महादेव धस (वय 16 रा. पाटीलवस्ती लोणीकाळभोर ता. हवेली जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रेणुका हरिश्चंद्र वाघमारे (वय 22, रा. गाढवे मळा लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेणुका वाघमारे या विवाहित असून गाढवे मळा परिसरात कुटुंबासोबत राहतात. त्यांची आई मंदा धस (वय 45), वडील महादेव, भाऊ अमोल व बाळकृष्ण हे पाटीलवस्ती परिसरात राहण्यास आहेत. फिर्यादी यांचे वडील महादेव धस यांनी त्यांचा भाचा विठ्ठल याला दुसऱ्या समाजाच्या मुलीबरोबर प्रेम सबंध ठेवु नको असे सांगितले होते.
दरम्यान, याचाच राग मनात धरून आरोपीने त्याच्या दोन साथीदारांना बोलावून मध्यरात्री गाढ झोपेत असताना, मामी मंदा धस, मामे भाऊ अमोल (वय 22) व बाळकृष्ण (वय 16) आणि नातेवाईक बाळा सुर्यभान गावडे (वय 17) यांच्यावर लाकडी दंडुक्याने मारहाण केली. या मारहाणीत चौघेजण गंभीर जखमी झाले होते. तर बाळकृष्ण धस याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधायक कलम 302 , 307, 452 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. जावेद खान यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात न्यायालयाने 16 साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष व ॲड. जावेद खान यांनी केलेले युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विठ्ठल गुंड याला भारतीय दंड विधायक कलम 302 अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, कलम 307 खाली 10 वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड व कलम 452 च्याखाली 5 वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी.चव्हाण यांनी दिले आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यात बाळकृष्ण धस (वय 16) याचा खून झाला आहे. नवतरुण मुलगा हरपल्याने त्याची नुकसान भरपाई होऊ शकत नाही. म्हणून त्याच्या आईवडिलांच्या भविष्याचा विचार करुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर या खटल्यात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी व महिला पोलीस हवालदार ललिता सिताराम कानवडे यांची सरकारी वकील ॲड. जावेद खान यांना महत्वाची मदत मिळाली.