पुणे : भरधाव वेगात असलेली दुचाकी घसरून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली. तर या अपघातात मुलाचे वडील व आई गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आदित्य सचिन भिंताडे (वय १२, रा. मोडक वस्ती, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहेत. अपघातात आदित्यचे दुचाकीस्वार वडील सचिन (वय ४३), आई वासंती (वय ३८) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन, पत्नी वासंती व मुलगा आदित्य यांच्यासह दुचाकीने बाह्यवळण मार्गावरून रविवारी दुपारी साताऱ्याकडे निघाले होते. नवीन कात्रज बोगद्याजवळ सचिन यांचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने सचिन, त्यांचा मुलगा आदित्य, पत्नी वासंती यांना दुखापत झाली. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव करत आहेत.