पुणे : पुण्यामधून एका अपघाताची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज (मंगळवार) पुणे दौऱ्यावर असून निवासस्थानाहून सर्किट हाऊसकडे जात असताना त्यांना संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वराचा अपघात झालेला दिसून आला. हे पाहून त्यांनी ताबडतोब आपला ताफा थांबवला आणि दुचाकीस्वाराच्या मदतीला धावून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पूर्ण दिवस पुणे शहर दौऱ्यावर असून आज सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ते सर्किट हाऊसला प्रशासकीय आढावा बैठका घेतील तर दुपारनंतर पुण्यनगरीतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेणार आहे.
तत्पूर्वी, अजित पवार यांना सकाळीच प्रशासकीय आढावा बैठकींना सुरुवात करायची असल्याने ते आपल्या निवासस्थानावरून सकाळी सहाच्या ठोक्याला बाहेर पडले. आपल्या शासकीय वाहनातून जात असताना प्रवासा दरम्यान संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा अपघात झालेला त्यांना दिसला. त्यांनी त्वरित आपला ताफा थांबवत अपघातग्रस्त व्यक्तीची चौकशी करून त्यांना धीर दिला. कुठे लागले तर नाही ना? अशी विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधला.
नेमकं अपघात कसा झाला? असे अजित पवार यांनी दुचाकीस्वाराला विचारले. त्यावर रिक्षा आडवी आल्याने किरकोळ अपघात झाला. परंतु केवळ हाताला खरचटले असल्याने काळजीचे कारण नाही. मी ठीक आहे, असे दुचाकीस्वाराकडून अजित पवार यांना सांगण्यात आले. अपघातग्रस्तावर ‘संचेती’ रुग्णालयात प्राथमिक उपचार करा, अशा सूचना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर आपल्या पुढील कामासाठी ते रवाना झाले.