पुणे : आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेच्या पुणे शहरातील आठही जागांवर उमेदवार देण्यासाठी पार्टी सज्ज असल्याचे अधिकृतरित्या पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. २०१९ ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर प्रचंड खाली गेला आहे.
सर्वसामान्य जनतेच्या समस्या मात्र प्रस्थापित पक्ष सोडवू शकलेले नाहीत. निवडणुकांमध्ये जनतेला एका प्रामाणिक, पार्टीचा पर्याय मिळावा, या हेतूने आम आदमी पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. शहरातील सर्व आठही जागा आम आदमी पक्ष जिंकेल, असा विश्वास यावेळी पार्टीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. यावेळी पार्टीचे राज्य सचिव अभिजीत मोरे, पुणे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, पुणे शहर प्रवक्ते किरण कद्रे तसेच सतीश यादव, सुरेखा भोसले निरंजन अडागळे, निलेश वांजळे, प्रशांत कांबळे, रुबीना काजमी, अक्षय शिंदे, संजय कोणे प्रीती निकाळजे, अॅड. प्रदीप माने उपस्थित होते.
यावेळी बेनकर म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत पार्टीच्या वतीने उच्चशिक्षित आणि चांगल्या चारित्र्याचे उमेदवार दिले जाणार असून इच्छुक उमेदवारांना शहरातील प्रश्नांची आणि समस्यांची चांगली जाण आहे. तसेच सर्व इच्छुक उमेदवारांनी मागील पाच वर्षांपासून विविध आंदोलनाच्या आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बेनकर म्हणाले, महाराष्ट्रात सत्तानाट्य, कोयता गॅंग, महिला अत्याचार, युवा बेरोजगार, शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. महायुती सरकार फक्त भ्रष्टाचारात तल्लीन आहे. तसेच सुसंस्कृत पुणे शहराला गुंडांचे शहर म्हणून नव्याने ओळख मिळाली आहे.
शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्ष बांधणी झालेली असून येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात मतदार आम आदमी पार्टीकडे वळतील, असा विश्वास यावेळी पक्षाचे युवा शहराध्यक्ष अमित म्हस्के यांनी यावेळी बोलून दाखवला.