पुणे : शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अशातच आता रागाने का बघतोय तुला जास्त मस्ती आली का, असा आरडाओरडा करुन गाडीची चावी काढून घेत दोघांनी एका तरुणाला फायटरने तोंडावर मारुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना रविवारी १० नोव्हेंबर रोजी रुबी हॉल क्लिनिकच्या मेन गेटसमोरील रोडवर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी सुरज सुभाष शिरोळे (वय-२६, रा. ताडीवाला रोड, रेल्वे क्वॉर्टर) यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून अनिल रेड्डी, विपुल हिंगवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र आकाश हे रुबी हॉल क्लिनिकच्या मेनगेटसमोरील रोडवर गाडीवर उभे होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. आरोपी म्हणाले तू आमच्याकडे रागाने का बघतोय़ तुला जास्त मस्ती आली का? असे मोठमोठ्याने आरडाओरडा करुन फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या गाडीची चावी काढून घेतली. तेव्हा फिर्यादी यांनी चावी का काढली असे विचारताच आरोपींनी थांब तुला आज खल्लासच करतो अशी धमकी दिली.
दरम्यान, फिर्यादीच्या अंगावर धावुन येत आरोपी फायटर याने डोक्यावर मारत असताना फिर्यादीने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात फायटरचा आघात त्यांच्या नाकावर लागला. आरोपींनी नाका तोंडावर जबरदस्त मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांना वाचविण्यासाठी आकाश हा पुढे आला, मात्र त्याला देखील फायटरने मारहाण करुन गंभीर जखमी केले. आम्ही इथले भाई लोक आहोत. आम्ही काही पण करु शकतो, अशी धमकी दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.