बारामती: बारामती येथील मुर्टी गावचे रहिवासी सुजित रघुनाथ जगदाळे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) अमृतसर येथे डीन म्हणून पदभार स्वीकारला आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून भारतातील एका सर्वोच्च व्यवस्थापन संस्थेत प्रतिष्ठित पदापर्यंत पोहोचणे हा जगदाळे यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी बनला आहे. आयआयएम अमृतसर येथे डीन म्हणून जगदाळे यांची नियुक्ती ही त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाची पावती आहे.
जगदाळे यांनी त्यांचे शालेय शिक्षण त्यांच्या गावातील बाभळीच्या झाडाखाली भरणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि नंतर ओडिशाच्या कलिंगा विद्यापीठातून ग्रामीण व्यवस्थापनात एमबीए केले. त्यांनी ग्रामीण प्रबंधक संस्थेतून पीएचडी देखील केली आहे, ही संस्था दुग्धाक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांनी स्थापन केली होती.
जगदाळे यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर व्यापक संशोधन केले आहे, ज्यामध्ये पंजाबमध्ये गवत अथवा गव्हाचे काड जाळण्यासंदर्भात महत्वाचे संशोधन केले आहे. त्यांनी बुंदेलखंड प्रदेशातील शेतकऱ्यांसोबत देखील काम केले आहे आणि अमेरिका, यूके, न्यूझीलंड, ब्राझील, फिनलंड, जर्मनी आणि ऑस्ट्रिया येथील विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली आहेत. त्यांचे संशोधन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे.
जगदाळे आपल्या यशाचे श्रेय शेतमजूर म्हणून काम करणारे त्यांचे आजी-आजोबा आणि शिक्षणाला प्राधान्य देणारे त्यांचे पालक यांना देतात. आजोबा दुसऱ्याच्या शेतात राबायचे. त्यांची प्रेरणा घेऊन सुजित हे शेतकऱ्यांसाठी संशोधन करतात. जेवण नसलं तरी चालेल परंतु मुलाला पुस्तक पाहिजे, म्हणून अनेक वेळेस उपाशी राहून आईवडिलांनी मला पुस्तक आणून दिली आहेत, त्यांच्या मुळे मी आज इथे पोहोचलो आहे, असे त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे. जगदाळे यांची कामगिरी खरच कौतुकास्पद असून अनेकांना प्रेरणा देणारी आहे.