पुणे : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या एका १९ वर्षाच्या तरुणाने कार थेट फुटपाथवर चढवून रस्त्याच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील टिळक रस्त्यावर घडला आहे. या घटनेत दुकानात असलेली काच फुटली. तसेच २८ फ्रीजचे तब्बल ११ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकान बंद असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
या वेळी क्रेन बोलवून कार बाहेर काढण्यात आली. याबाबत मनमितसिंग हरबनसिंग छाबरा (वय ४७, रा. विद्यासागर कॉलनी, सॅलसबॅरी पार्क) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चालक शिवपुत्र कमलाकर बेळ (वय १९, हडपसर, काळेपडळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपुत्र बेळ हा कार घेऊन वेगाने अलका चित्रपटगृहाकडून टिळक रोडने स. प. महाविद्यालयाकडे जात होता. साहित्य परिषद चौकातून पुढे आल्यावर त्याने एका वाहनाला वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरुन दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात वेगात असल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार विरुद्ध बाजूच्या फुटपाथवर चढली.
त्यानंतर तिने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक या दुकानाच्या शटरला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की़ दुकानाचे शटर पूर्णपणे निखळले. या घटनेत २८ फ्रीज, लॅपटॉपचे तब्बल ११ लाख ५२ हजार १२० रुपयांचे नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.