शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर, केवटेमळा येथे असलेल्या वडजाई माता मंदिरातील देवीचा चांदीचा मुखवटा, सोन्याचे मणीमंगळसूत्र व आदी साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातील ग्रामस्थांनी येथील वडजाई माता मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करत देवीला चांदीचा मुखवटा बसवलेला होता. शनिवारी (दि.6 जुलै) रोजी सकाळच्या सुमारास येथील तुषार चव्हाण हा मंदिराजवळ गेलेला असताना त्याला मंदिराच्या दरवाजा उघडा दिसला. त्याने मंदिरात पाहिले असता देवीचा चांदीचा मुखवटा दिसला नाही. त्याने याबाबतची माहिती ग्रामस्थांना देताच ग्रामस्थांनी पाहणी केली असता चांदीचा मुखवटा, सोन्याचे मणीमंगळसूत्र, पितळी समई व माईक सिस्टीम चोरीला गेल्याचे समोर आले.
दरम्यान, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस नाईक शिवाजी चितारे, शंकर साळुंखे, निखील रावडे यांसह आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत तुषार काशिनाथ चव्हाण (वय 30 वर्षे रा. केवटेमळा, शिक्रापूर ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.