न्हावरे,ता. 29: तांदळी(ता.शिरूर) येथील परिसरातील कळसकरवाडी येथे कंपनीसमोर माल भरण्यासाठी उभा केलेला ट्रक भरधाव वेगाने चोरून घेऊन जाताना, समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकशी जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अल्पवयीन ट्रक चोर ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी(ता. 28) मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. गौरव अनिल कांबळे(वय-17 वर्षे, रा. शिरसगाव काटा, ता.शिरूर, जि.पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन ट्रक चोराचे नाव आहे. ट्रकमालक संजय मोरे (रा.काष्टी,ता.श्रीगोंदा,जि. अहिल्यानगर) यांनी मांडवगण फराटा(ता.शिरूर)येथील पोलिस ठाण्यात दोघा संशयित चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या अपघातात दुसऱ्या ट्रकवरील पांडुरंग सुभाष बडदे हा चालक गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ट्रक चालक व मालक संजय मोरे यांनी गुरुवारी साडेनऊच्या सुमारास स्वतःचा ट्रक तांदळी परिसरातील धनसंजीवनी कंपनीत माल भरण्यासाठी लावला होता. त्यानंतर ते आपल्या जिरेगाव येथील घरी गेले होते. दरम्यान, फिर्यादी संजय मोरे हे झोपेत असताना शुक्रवारी (ता. 28)पहाटे दोनच्या सुमारास अक्षय कळसकर यांनी संजय मोरे यांचा मुलगा अक्षय मोरे याला फोनवरून सांगितले की, तुमच्या ट्रकचा कळसकरवाडी येथे अपघात झाला असून, तुम्ही लवकर या. यावेळी मुलासह त्यांनी कळसकरवाडी येथे जाऊन पाहिले असता कंपनीजवळ एम.एच- 12 ,डब्लू.जे-1444 या ट्रकने तांदळी वरून न्हावरे बाजूकडे जाणाऱ्या एम.एच- 46 ए.आर- 6385 या ट्रकला समोरून जोरदार धडक दिली.
त्यामुळे दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले. एका ट्रक चालकास दौंड येथील पानसरे हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी दाखल केले. तसेच चोरी केलेल्या दुसऱ्या ट्रकचा अपघातग्रस्त चालक गौरव कांबळे याला न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात ॲम्ब्युलन्समधून उपचारासाठी पाठवले असता, न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी उपचारापूर्वी अल्पवयीन ट्रक चोर मुलगा मयत झाल्याचे घोषित केले.
दरम्यान मोरे यांनी मुलासह कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, गौरव अनिल कांबळे व गणेश कानिफ कदम या दोघांनी ट्रकची चोरी केली असल्याचे त्यांना फुटेजमध्ये दिसून आले. त्यापैकी गणेश कदम हा तेथून निघून गेला होता. मात्र, गौरव कांबळे स्वतः ट्रक चालवत घेऊन जात असताना काष्टी रस्त्यावर कळसकरवाडीजवळ त्याने भरधाव वेगात ट्रक चालवत समोरील येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच दुसऱ्या ट्रकचा चालक पांडुरंग सुभाष बडदे याला किरकोळ व गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गौरव अनिल कांबळे व गणेश कानिफ कदम (रा.शिरसगाव काटा,ता.शिरूर, जि.पुणे) या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.