पुणे : येरवडा परिसरातील वडार वस्ती येथील लक्ष्मी नगर येथे एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तनिषा शांताराम मनोरे (वय-16) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. तसेच तिची मैत्रीण जास्त प्रमाणात दारू पिल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
तनिषा मनोरे हिची 16 वर्षीय मैत्रीण दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत तिच्याच घरी आढळून आली आहे. या मुलींनी एकत्र येऊन दारू पिली. त्यानंतर अती दारु पिल्याने त्यांनी उलट्या केल्याचे आढळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळ यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तनिषा मनोरे आणि तिची मैत्रीण येरवडा पोलीस ठाणे हद्दीमधील वडार लक्ष्मी नगर परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, मुली त्यांच्या ओळखीच्या 16 वर्षीय मुलाला फोन करुन त्याच्या घरी आल्या होत्या. तो घरी आला असता त्याला तनिषाने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने तनिषाला खाली उतरवून तिच्या तोंडावर पाणी मारले.
तसेच तिच्या आईला या घटनेबाबत माहिती देऊन बोलवून घेतले. तनिषाला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तनिषाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, तिच्यासोबत असलेली मैत्रिणीने जास्त प्रमाणात दारु पिल्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत दिसून आली होती. तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तिला देखील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.