लोणी काळभोर (पुणे) : मांजरी बुद्रूक (ता. हवेली) हद्दीतील गोडबोले वस्ती परिसरातील एका फर्निचरच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी सापडल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांकडून मागील दोन तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी बुद्रुक परिसरात फर्निचरचे मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. काही वेळातच दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली. मात्र, या गोडाऊनमध्ये लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग काही वेळातच भडकली. जवानांनी आगीवर पाण्याचा जोरदार मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला.
गोडाऊनला लागलेली आग शॉर्ट सर्किटने लागल्याची चर्चा आहे. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या ७ अनिशामक गाड्या व पीएमआरडीची एक गाडी यांच्याकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलातील केंद्रप्रमुख अनिल गायकवाड, कैलास शिंदे, हडपसर केंद्राचे चालक नारायण जगताप, फायरमन बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले, नितेश डगळे, चंद्रकांत नवले, संदीप रणदिवे, गौरव कांबळे, उन्मेष कोंडगेकर, माने, जोशी, यादव, ओव्हाळ प्रयत्न करीत होते. तसेच ड्युटी संपवून घरी चाललेले तांडेल जवान मंगेश टकले आणि ड्रायव्हर दत्ता आडागळे यांनी घटनास्थळी पोचून शर्थीचे प्रयत्न केले.