पुणे : पुण्यातील ससून रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असते. अशातच आता ससून रुग्णालयातील आणखी एक आर्थिक घोटाळा समोर आला आहे. ससून रुग्णालयाच्या शासकीय बँक खात्यातील रक्कम स्वत:च्या आणि इतर 23 सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करुन तब्बल 4 कोटी 18 लाख 62 हजार रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अकाऊंट आणि रोखपाल यांच्यासह अन्य 23 सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालयातील 16 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
याबाबत रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे (वय-55, रा. पिंपळे गुरव) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तत्कालीन लेखपाल अनिल माने (वय 53, रा. हडपसर), रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार (वय 45, रा. क्वीन्स गार्डन, कॅम्प) यांच्यासह 23 जणांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 जुलै 2023 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैर व्यवहारामध्ये लेखपाल माने यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ, यांच्यासह काही खासगी व्यक्तीचा सहभाग आहे. शासन आदेश, शासन मान्यता/ अधिष्ठाता यांची मान्यता नसताना परस्पर आहरण व सवितरण अधिकारी (डी डी ओ) यांच्या खात्यातील रक्कमा प्रशासकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने ससून रुग्णालयातील 16 शासकीय कर्मचारी व इतर 8 खासगी व्यक्तींच्या खात्यात हस्तांतरीत करुन अपहार करुन सरकारची फसवणूक केली, असे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
तसेच ससून रुग्णालयातील आर्थिक नोंदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे ससून प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर ससून प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राथमिक चौकशी केली़ असता यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले़. त्यामुळे तात्काळ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
रक्कम हस्तांतरीत केलेल्यांची नावे :
निलेश शिंदे (कक्ष सेवक), सचिन ससार (वरिष्ठ लिपिक, शासकीय महाविद्यालय, बारामती), पुजा गराडे (वरिष्ठ लिपिक, शासकीय महाविद्यालय, बारामती), सुलक्षणा चाबुकस्वार (वरिष्ठ सहायक, रोखपाल), सुनंदा भोसले (आया, सेवानिवृत्त), सुमन वालकोळी (अधि. परिचारिका, ससून), अर्चना अलोटकर (अधि. परिचारिका), मंजुशा जगताप (अधि. परिचारिका), दिपक वालकोटी (वरिष्ठ लिपिक, शासकीय महाविद्यालय, बारामती), सरिता शिर्के (खासगी व्यक्ती), संदेश पोटफोडे (खासगी व्यक्ती), अभिषेक भोसले (खासगी व्यक्ती), संतोष जोगदंड (वरिष्ठ लिपिक, ससून), दयाराम कछोटिया (शासकीय महाविद्यालय, बारामती), श्रीकांत श्रेष्ठ (कनिष्ठ लिपिक, ससून), भारती काळे (खासगी व्यक्ती), उत्तम जाधव (सेवानिवृत्त, सिटी स्कॅन तंत्रज्ञ), संदिप खरात (वैद्यकीय समाजसेवक, अधिक्षक, ससून), अनिता शिंदे (खासगी व्यक्ती), नंदिनी चांदेकर (अधि़ परिचारिका, ससून), सरिता अहिरे (खासगी व्यक्ती), शेखर कोलार (खासगी व्यक्ती), सरिता लहारे (अधि़ परिचारिका, ससून), राखी शहा (खासगी व्यक्ती) यांच्या बँक खात्यावर 4 कोटी 18 लाख 62 हजार 942 रुपये जमा करण्यात आले असून त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.