पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. दारु पिल्यानंतर जेवणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून डोक्यात फरशी मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास भिडे पुलाकडे जाणार्या रस्त्यावरील पत्र्याच्या खोलीमध्ये घडली आहे. या प्रकरणी मृत्युंजय शंकर सिंग (वय- ३९, रा. भिडे पुलाजवळ, नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून आश्विन यादव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे झारखंड येथील राहणारे आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून भिडे पुलाजवळील गफूर पठाण यांचे बी. पी. कन्स्ट्रकशनचे बांधकाम सुरु आहे. इमारतीमध्ये ठेकेदार अप्पा कांबळे याच्यामार्फत हे दोघेजण बांधकाम मजूर म्हणून सेट्रिंगचे काम करत आहेत. तेथे तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या पत्र्याचे खोलीत राहतात. त्यांच्या शेजारच्या खोलीत संदीप कुमार व त्यांचा सहकारी आश्विन यादव हे रहातात. बुधवारी रात्री पावणे दहा वाजता संदिप कुमार व आश्विन यादव हे दोघे दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात जेवणावरुन आपसात भांडण सुरु होते.
दरम्यान, आश्विन यादव हा संदीपकुमार याला शिवीगाळ करत होता. तेरा बहोत हो गया नाटक, तुझे आज छोडूगा नही, तेरा खेल आज खतम कर देता, असे म्हणून धमकी देत होता. त्यावेळी फिर्यादी व राहुल सोनकांबळे यांनी त्या दोघांचे भांडण सोडविले. त्यानंतर संदीपकुमार हा रुममधून बाहेर पडून बांधकाम साईटच्या खाली भिडे पुलाकडे निघाला. त्यावेळी आश्विन यादव हा देखील संदीप कुमार याच्या मागे धावत गेला.
मात्र, त्याने वाटेत पडलेली फरशी हातात घेऊन जादा बोलता है आज तेरा खेल खतम असे म्हणून संदीप कुमार याच्या डोक्यात मागून हातातील फरशी जोराने मारली. त्यामुळे संदीपकुमार खाली पडला. तेव्हा आश्विन याने पुन्हा त्याच्या फरशी डोक्यात मारली. आणि तेथून तो पळून गेला. फिर्यादी व इतरांनी संदीपकुमार याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड करीत आहेत.