लोणी काळभोर (पुणे) : शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेलेल्या एका ३५ वर्षीय शेतकऱ्याला नागाने दंश केला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. २८) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
चित्रसेन पांडुरंग जवळकर (वय -३५, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) असे शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रसेन जवळकर हे आळंदी म्हातोबाची येथील श्री म्हातोबा जोगेश्वरी नवरात्र उत्सव कमिटीचे अध्यक्ष होते. गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेले होते. या वेळी अचानक त्यांना नागाने दंश केला. त्यामुळे ते ओरडले. ओरडण्याचा आवाज ऐकून लोकवस्तीतील नागरिक तत्काळ त्याठिकाणी हजर झाले. तोपर्यंत चित्रसेन घाबरून बेशुद्ध पडले होते.
जवळच असलेल्या नागरिकांनी त्यांना रिक्षातून लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच आळंदी म्हातोबाची परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेने आळंदी म्हातोबाचीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत शांत, संयमी, हसतमुख असलेल्या चित्रसेन यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, भावजय, एक मुलगा, पुतणी, पुतण्या असा परिवार आहे.