उरुळी कांचन, (पुणे) : दर महिन्याला पाच हजार रुपये सुरु करा नाहीतर तुला व तुझ्या वडीलांना कोयत्याने तोडून जिवे ठार मारील. अशी धमकी दिल्याप्रकरणी एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपेवस्ती येथील किराणा मालाच्या दुकानासमोर गुरुवारी (ता. 01) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
दत्ता दिगंबर ठोंबरे (वय-38 रा. हरिजीवन हॉस्पिटलच्या पाठीमागे उरुळी कांचन. ता. हवेली), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रोहन सतीश आच्छा (वय 35, धंदा – व्यवसाय रा. आश्रम रोड, उरुळी कांचन ता.हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन आच्छा यांचे उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपेवस्ती येथील किराणा मालाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकानात कामगार व वडील सतीश मदनलाल आच्छा असताना त्या ठिकाणी ओळखीचा दत्ता उर्फ दत्तात्रय ठोंबरे दुकानात आला होता.
यावेळी फिर्यादी रोहन व वडीलांना म्हणाला की, मला दर महिन्याला पाच हजार रूपये पैसे सुरु करा नाहीतर तुला व तुझे वडीलांना कोयत्याने तोडून जिवे ठार मारील. नाही दिले तर तुमच्याकडे बघतो मी पोलीसांना व कोणालाच घाबरत नाही माझ्यावर खूप केसेस आहेत. याप्रकरणी रोहन आच्छा यांनी दिलेल्या तक्रारीवरून दत्ता उर्फ दत्तात्रय ठोंबरे याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी ठोंबरे याच्यावर जेजुरी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून ठोंबरे यांची निर्दोष सुटका झालेली आहे. तसेच लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.