लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एका वाटसरूचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तोरणा हॉटेलच्या समोर गुरुवारी (ता. 5) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर या अपघातात दुचाकीवरील तिघेजणही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात दुचाकी चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र जनार्दन तांदळे (वय-39, सध्या रा. लोणी काळभोर, ता. हवेली, मूळ रा. चराटा, बीड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सौरभ काशिनाथ धुमाळ (वय-16), आदित्य बापू कांबळे (वय-17) ओमकार जनार्दन जोगदंड (वय-18 सर्व रा. माळी मळा, लोणी काळभोर) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी मृतक राजेंद्र तांदळे यांचे मोठे बंधू बाळू जनार्दन तांदळे (वय-40, रा. हाके वस्ती, शेवाळवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीचालक ओमकार जोगदंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र तांदळे हे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील तोरणा हॉटेलच्या समोरून रस्ता ओलांडत होते. तर ओमकार जोगदंड, आदित्य कांबळे व सौरभ धुमाळ हे ट्रिपल सीट दुचाकीवरून सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चालले होते. तर ओमकार जोगदंड हा भरधाव वेगाने गाडी चालवीत होता.
दरम्यान, गुरुवारी (ता.5) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तांदळे हे रस्ता ओलांडत असताना, दुचाकीने तांदळे यांना दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यानंतर दुचाकी डिव्हायडर ला जाऊन धडकली. या अपघातात तांदळे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुचाकीवरील ओमकार जोगदंड, आदित्य कांबळे व सौरभ धुमाळ हे तिघे गंभीर जखमी झाले होते. जखमींना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे.
ओमकार जोगदंड याने ट्रिपल सीट मोटारसायकल चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. तसेच जोगदंड याने भरधाव वेगाने दुचाकी चालवून राजेंद्र तांदळे यांना जबर ठोस मारली. या अपघातात तांदळे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तांदळे यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी ओमकार जोगदंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार करीत आहेत.