लोणी काळभोर : चार वर्षाचा सुमारे 1 कोटी 9 लाखांचा मुल्यवर्धित कर कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका व्यावसायिकाने थकविल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच, उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश संतराम घोडके (रा. गट नं 711, थेउर फाटा, कुंजीरवाडी ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुनमन रकिक तांबोळी (वय 36 रा. एफ 38. कुंदन कुशलनगर सोसायटी, खडकी पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद फिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनमन तांबोळी हे येरवडा येथील वस्तु व सेवाकर विभागात राज्य कर निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. तांबोळी हे मुल्यवर्धित कर संकलन व वसुलीचे काम पाहतात. तर सतीश घोडके यांचा वाहनांचे सुटे भाग विक्रीचा व्यवसाय आहे. कुंजीरवाडी परिसरात त्यांचे समर्थ केअर स्टेशन नावाने दुकान आहे. आरोपी घोडके यांनी आर्थिक वर्ष 2010-11, 2013-14, 2014-15, 2015-16 या कालावधीत मुल्यवर्धित कर भरला नव्हता.
दरम्यान, याबाबत वस्तू आणि सेवा कर कार्यालयाकडून आरोपी घोडके यांना वेळोवेळी सांगण्यात आले होते. तसेच घोडके यांना कारणे दाखवा नोटीसही बजाविण्यात आल्या होत्या. आरोपी घोडके यांनी सदर नोटीसचे लेखी अथवा समक्ष हजर राहुन अथवा प्रतिनिधी हजर राहुन उत्तर दिले नाही. त्यानंतर सुध्दा कर भरणा करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करुन देखील आरोपी घोडके यांनी कर भरला नाही.
याप्रकरणी अर्जुनमन तांबोळी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतीश घोडके यांच्यावर महाराष्ट्र मुल्यवर्धित कर कायदा सन 2002 चे कलम 74 (3). (ह) व कलम 74 (3) (ट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
हि कामगिरी अतिरिक्त राज्य कर आयुक्त धनंजय आखाडे, सहआयुक्त रेश्मा घाणेकर, उपायुक्त सुधीर कुंभार, सुहास कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अंजुमन तांबोळी, मनेश गांगुर्डे यांनी केली आहे.